Wednesday, April 17, 2019

प्रबोधन मालिका - भाग ३


प्रबोधन मालिका - भाग 3
‘कौशल्य विकास’ लोक चळवळ बनवात्यासाठी प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाका !
‘कौशल्य विकास’ या संदर्भात दर रविवारी मी व्हॉट्सअ‍ॅप मालिका सुरू केली. त्याच्या दोन्ही भागांना खूप-खूप मोठा प्रतिसाद लाभला ही आनंदाची बाब आहे. मला अनेकांनी फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून संपर्क साधला. यासंदर्भात माझ्या समवेत काम करण्याची इच्छा देखील अनेकांनी व्यक्त केली. तसेच देशातील अती श्रीमंत वर्गावर 0.5 टक्के अतिरिक्त शिक्षण कर लावावा या माझ्या सूचनेलाही संपर्क साधणार्‍या प्रत्येक व्यक्तीने मनापासून पाठिंबा दिला. या प्रतिसादामुळेच ‘कौशल्य विकास’ ही चळवळ बनवली पाहिजे ही माझ्या मनातील धारणा अधिक बळकट झाली आहे. या संदर्भात सर्व काही शासनच करेल असे न मानता लोकसहभाग जर वाढला तरच ‘कौशल्य विकास’ ही चळवळ बनू शकेल असे मला वाटते आणि त्याचसाठीचे विवेचन मी येथे केले आहे. 

‘कौशल्य विकास’ हा आता आपल्या देशात परवलीचा विषय झाला आहे. किंबहुना देशातील बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी कौशल्यविकासाला पर्याय नाही याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना झाली आहे ही विशेष समाधानाची बाब मानावी लागेल. कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन गेल्या सुमारे 10 वर्षांपासून आपल्या देशात प्रथम यूपीए आणि आता एनडीए सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या कौशल्य विकास या गुरू मंत्राची सुरूवात आपल्याकडे फार पुर्वीपासून व्हायला हवी होती असे निश्चित वाटते.  

आता आपल्या देशातही कौशल्य विकासासाठी केंद्र व राज्य पातळीवर अनेक उपक्रम धडाडीने राबवले जात आहेत. मात्र हे प्रयत्न देखील अपुरे ठरतील एवढा हा प्रश्न गहन बनला आहे. मागील लेखमालेत मी उल्लेख केल्याप्रमाणे रेल्वेच्या 90 हजार नोकर्‍यांसाठी तब्बल 3 कोटी अर्ज आलेत. यावरून आपल्या देशातील बेकारीचे स्वरूप जाणवते. मात्र येथे लक्षात घेतले पाहिजे की, केवळ सरकारी नोकर्‍या अथवा सरकारने केलेल्या विकास कामांमुळे निर्माण होत राहिलेला रोजगार तसेच खाजगी कंपन्या व संस्था यांमधील रोजगार यापलिकडेही कोट्यावधींच्या रोजगार निर्मितीची गरज आहे. हे अवाढव्य काम ते केवळ सरकार करू शकेल असा दावा कोणीच करू शकत नाही. देशातली शासकीय व खाजगी गुंतवणूक वाढवून नवीन रोजगार निर्मितीस प्रोत्साहन दिलेच पाहिजे. पण अनेकदा नोकर्‍या अथवा रोजगार उपलब्ध होणे शक्य असतानाही केवळ कौशल्य नसल्यामुळे तेथे योग्य उमेदवार मिळत नाही आणि बेकारांचे तांडेच्या तांडे फिरत राहतात, त्यातून सामाजिक उद्रेकही होत राहतो. 

यासाठीच देशातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि त्यामध्ये कौशल्य विकासाचे शिक्षण देण्याची गरज, त्यासाठी आवश्यक इंन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी, प्रशिक्षकांची उपलब्धता अशा सार्‍याच बाबतीत जर ‘कौशल्य विकास’ ही लोकचळवळ बनली तर देशात चालू असलेल्या या संदर्भातील कार्याला पूरक काम उभे राहील आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकजण घेऊ शकतो. 
एवढा मोठा गहन प्रश्न आणि त्यात मी काय करणार असा प्रश्न कोणीही विचारू शकेल. मात्र एकदा विचारांनी पकड घेतली आणि योग्य दिशा मिळाली की कोणतीही छोटी अथवा मोठी कृती अशक्य नसते हे इतिहासातील अनेक दाखल्यांवरून दिसून येते. आपण प्रत्येकजणच सार्वजनिक जीवनात काहीतरी चांगले योगदान द्यावे अशी इच्छा व्यक्त करत असतो. मात्र नेमके काय करायचे हेच कळत नसते. अशावेळी मिळेल त्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी योगदान देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. 

प्रत्येक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटना, कामगार संघटना, युवक व विद्यार्थी संघटना, महिला मंडळे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा विविध माध्यमातून काम करीत आपण कौशल्य विकास या संकल्पनेला चालना देऊ शकतो. 18 ते 35 वर्षे वयोगटातील तरूण-तरूणींना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबवू शकतो. एस्पायर नॉलेज अ‍ॅन्ड स्किल्स् (इंडिया) प्रा. लि. या माझ्या संस्थेतर्फे आतापर्यंत महाराष्ट्रातील 40 हजारहून अधिक तरूण तरूणींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मी देऊ शकलो. हे अवघड शिवधनुष्य मी उचलले आहे. या क्षेत्रात अजून भरीव काम करण्यासाठी माझे प्रयत्न चालूच आहेत. अनेक राजकीय पक्ष, संस्था व संघटना ‘नोकरी महोत्सव’ भरवतात. तेही आता ‘नोकरी महोत्सव’च्या आधी ‘कौशल्य विकासाची’ शिबीरे आयोजित करण्यासाठी माझ्याकडे विचारणा करीत आहेत. ही उमेद वाढवणारी बाब आहे. अशा सर्वांच्याच प्रयत्नातून ‘कौशल्य विकास’ ही ‘लोकचळवळ’ बनण्यात निश्चित सुरूवात होईल हा विश्वास मला आहे. देशातील बेकारीची समस्या कमी करण्यासाठी मी काहीतरी करू शकलो ही भावना देखील मनाला आनंद देणारीच असणार आहे. यासाठीच आपण सारे एकत्र येऊया, विचारांचे आदान प्रदान करूया आणि जमेल तेथे आणि जमेल तेवढे कौशल्य विकासाचे कार्य करीत राहू या. यातून शिकलेल्या तरूण तरूणींना रोजगार उपलब्ध झाला तर ते फार मोठे पुण्याचे काम असेल. 

यासाठी आपण वाचा व विचार करा. कौशल्य विकास ही लोकचळवळ बनविण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. या कार्यासंदर्भात आपले महाराष्ट्र शासन करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती पुढील भागात देईन. कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर असो, रोजगार निर्मितीसाठी त्याचे कसे प्रयत्न चालू असतात आणि कौशल्य विकासासाठी शासन काय प्रयत्न करीत असते याची माहिती देखील आपल्याला त्यातून होईल. लोकचळवळ अधिक विस्तारण्यासाठी अशा माहितीचा देखील खूप उपयोग होईल असे मला वाटते. आपण विचार करून निर्णय घ्या, कौशल्य विकास ही लोकचळवळ बनण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हा. आपल्या आसपासच्या तरूण-तरूणींना एकत्र करून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. ही देखील मोठी लोकसेवाच असेल. अशा सर्व इच्छुकांना एस्पायर नॉलेज अ‍ॅन्ड स्किल्स् (इंडिया) प्रा.लि. तर्फे सर्व सहकार्य आम्ही करू हा भरोसा मी येथे देतो. धन्यवाद !

No comments:

प्रबोधन मालिका भाग ५ - महाराष्ट्रात क्लस्टर योजना

महाराष्ट्रात क्लस्टर योजना अकुशल कामगारांची समस्या मोठी !       कौशल्य विकासाबाबत देशातील अन्य राज्यांप्रमाणेच आप ले महाराष्...